मी आजारी पडते आणि कुठल्यातरी गंभीर आजारामुळे माझ्यावर शस्त्रक्रिया केली जाते. हि बाब कळते, तेव्हा माझे मित्र-मैत्रींनी, नातेवाईक, शेजारी, दफ्तरातील सहकारी मला फुलांचा बुके, फळे, खाऊ घेऊन भेटायला आतुरतेने येतात; कारण त्यांना काळजी लागून राहीलेली असते कि, मी बरी असेल कि नही ? अगदी याउलट हि दिसते; ते असे कि जेव्हा आपले नातेवाईक आजारी असतात तेव्हा आपण हि त्यांना त्याच पद्धतीने भेटायला जातो जसे ते आपल्याला भेटायला आले होते. यातून पाच गोष्टी दिसून येतात - आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, कृतज्ञता, आणि माणुसकी. आणि हीच माणुसकी, कृतज्ञता जर मानवी स्वभावातून नाहीशी झाली तर .....?
आजची परिस्थिती नमूद करण्याची येथे मुळीच गरज नाही. समाज हा मानावाला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्वाचा असतो. परस्परपूरक असणाऱ्या या समाजात मानवी नैतिक मुल्ये रुजलेली असतात. आणि जर नैतिक मुल्ये, माणुसकी आणि नातेसंबंध यांवर गदा आली तर....?
हो, आज कोरोना महामारीने अक्षरशः मृत्युतांडव रचलेलं दिसतंय. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृध्द, शारीरिक ते मानसिक, राजकीय ते सामाजिक स्तर, ग्रामीण तो शहरी भाग, गरीब असो कि श्रीमंत, कनिष्ठ जातीचा असो वा वरिष्ठ, सांस्कृतिक असो कि शैक्षणिक, गृह्व्यवस्था ते अर्थव्यवस्था, पर्यावरण ते वातावरण अगदी सर्वच क्षेत्रांना कोरोनाने भरडून काढलेले दिसते. याचाच परिणाम म्हणून आज देशात माणुसकी हरपल्याचे दृश्य दिसत आहेत. असे का ?
वरील आजारपणाबद्दल सांगणे/भविष्यातील मानवी वृत्तीचा तर्क लावण्यामागचा उद्देश काय ?
आज मितीला कोरोनाची स्थिती पाहता, सामाजिक आरोग्य व मानव प्रजातीचं अस्तित्व धोक्यात आहे. मृतदेहांचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. याच कलहातून व्यक्तीमध्ये मानसिक ताणताणाव निर्माण होऊन, मानवी स्वभावामध्ये अनेक बदल झालेले दिसतात. मग ते सामाजिक असो कि राजकीय स्तरावर किंवा शारीरिक असो कि मानसिक. याला सतत कुलुपबंद स्थितीत राहणे, बेरोजगारी, कौटुंबिक मतभेद, निराशा अशा गोष्टी जबाबदार असू शकतात. कोरोनाच्या उद्रेकामुळे लोक आज एवढे भांबावून गेले आहेत कि, त्यांनाच कळात नाही आहे कि आपल्या अवतीभोवती काय चालू आहे. जसे कि कुठे लसीकरण सुरु आहे तर कुठे लसींकरणाचा अभाव, कुठे औषधांचा काळा बाजार सुरु आहे तर कुठे हिंसाचार, अविवेकीपणा, बहिष्कार किंवा वाळीत टाकण्यासारख्या गोष्टी.
One such Incident (अशीच एक घटना)
हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर. डॉक्टरांनी एक दिवस अस्वस्थपणा जाणवत असल्याने स्वतःची RT-PCR चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट covid positive आला. लक्षणे तशी सौम्य होती मात्र; स्वतःला आणि इतरांना हि त्रास नको म्हणून काही दिवस त्यांना घरात विलागीकारणाचा सल्ला देण्यात आला. ते एका सोसायटी मध्ये राहत असत. त्यांनी सोसायटीच्या आत प्रवेश केला व घराचा दरवाजा उघडन्यापूर्वीच त्यांना आत प्रवेश करून तेथे राहण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर नाईलाजाने त्यांना हॉस्पिटलच्या स्टोअर रूममध्ये रहाव लागलं........सांगण्याचा उद्देश हा कि,असा मज्जाव करणे योग्य नाही. ते नैतिकतेमध्येहि बसत नाही. आपण रुग्णाला आश्रय देऊन सामाजिक/शारीरिक अंतर ठेऊन रुग्णाची देखभाल करायला हवी. आपण आपली नैतिक मूल्ये विसरून चालणार नाही. कारण समाजात नैतिकतेची पाळेमुळे रुजलेली असतात. आणी याच समाजात आपण असा तुटकपणा आणि अविवेकीपणा दाखवणे म्हणजे हळू-हळू माणुसकीला तडा बसनेच होईल.
Migration (स्थलांतर)
पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी लोक गावाकडून शहराकडे रोजगाराच्या शोधात स्थलांतर करतात. भारत देशात चौदा कोटी लोक स्थलांतरित आहेत. या स्थलांतरित लोकांमध्ये हातावर पोट असणारे, अर्धवेळ काम करून शिक्षण घेणारे विद्यार्थी, मजूर, कामगार वर्ग, लघु व्यावसायिक, महिला कामगार इत्यादींचा समावेश आहे. या स्थालातारीतांना कोरोनाच्या धोक्यामुळे गावाकडे स्थलांतरित व्हावे लागले. त्यातील गर्भवती महिलांना किती त्रास झाला हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल -
"ती" चे (गर्भवती) दिवस भरत आले होते. अचानक कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे कुलुपबंद करण्यात आले व ति गावाकडे स्थलांतर करण्यास प्रवृत्त झाली. अशा अवस्थेत हि, एक हात पोटावर व दुसरा कमरेवर ठेवून ती अनवाणी पायाने पती व दोन मुलांबरोबर पायपीट करत होती. स्वतःबरोबर अन्नाचा कण ही कि पाण्याचा थेंब हि नही अन स्वतः व कुटुंब उपाशी असताना ती रस्ता तुडवत होती. काहीक मैल चालत गेल्यानंतर तिला अचानक प्रसूती कळा सुरु झाल्या. सुदैवाने आसपासच्या महिलांनी तिला आधार देत तिची सुरक्षितपणे प्रसूती केली. तिने मुलीला जन्म दिला होता. त्या महिलांनी तिला व कुटुंबाला खायला अन्न आणि पाणी दिल. थोड्याच वेळात ती उठून (सोबत पती अन तीन लेकर ) परत चालू लागली.......यातील सुदैवाचा भाग असा कि, गर्भवती महिलेला आधार मिळाला. तसेच तिची सुरक्षितरीत्या प्रसूती झाली आणि जच्चा व बच्चा दोन्ही सुखरूप होते. येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, यासारख्या कितीतरी महिला आहेत ज्यांना अशा कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागणे.
Boycott (बहिष्कार)
एखाद्या गावातील निम्न/कनिष्ठ जातीतील पुरुषाचा मृत्यू (कोरोनाने नाही, इतर कारणाने ) होतो. त्या व्यक्तीला मुलगा नसून, सात मुली असतात्त. जेव्हा त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते; तेव्हा कुठलाच नागरिक त्या मृत व्यक्तीस खांदा देण्यास तयारी दाखवत नाही. कारण मृत व्यक्तीच्या कुटुंबावर समाजातील लोकांनी बहिष्कार टाकलेला असतो.. त्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलेले असते. शेवटी मृत व्यक्तीला तिच्या सात मुली खांदा देतात. अशी लज्जास्पद घटना आपल्या समाजात घडू शकते हे आपण भाकीत हि करू शकत नाही.
हा सर्व प्रकार कोरोनाच्या भितीमुळे पहावयास मिळतो. अशा अनेक घटना आपल्याला पहावयास मिळतात. त्या येथे नमूद करणे कठीण. लोकांच्या मनामध्ये कोरोनाची एवढी भीती निर्माण झाली आहे कि, लोक एकमेकांना घृणास्पद भावनेने बघत आहेत, इतरांचा तिटकारा करत आहेत. घरातील एखादी जरी व्यक्ती करोना positive आली, तर त्या व्यक्तीला देखील वाळीत टाकल्याप्रमाणे वागणूक दिली जाते. वरील सर्व घटनांची चिकित्सा केली पाहिजे. यावरून असे लक्षात येईल कि करोना महामारीमुळे मानवी स्वभावात बदल होत चालला आहे. अशा कठीण काळात आपण एकमेकांना सोबत व धीर दिला पाहिजे. परंतु तस होताना दिसत नाही.समाजात माणुसकी टिकून ठेवायची असेल तर, कोरोनाला नात्यांवर स्वार होऊ देऊ नका.
शेवटी वृद्ध पाण्याच्या प्रवाहात......
नांदेड जिल्ह्यातील विक्रमाबाद जवळची घटना. पूल पार करत असताना एक वृध्द आजोबा हातात काठी अन पायाचा थरकाप होतोय. पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो कि काय...असे ते पुलावर उभे होते. पुलाच्या दोन्ही टोकाला बघ्यांची गर्दी होती. लोक या वृद्धास वाचवण्याऐवजी व्हिडीओ करत उभे होते. शेवटी पुलावरील पाण्याच्या प्रवाहात ते आजोबा वाहून गेले व त्याचा मृतदेह शेजारील एका तलावात आढळला. हि वृद्ध व्यक्ती वाहून गेल्यानंतर काही तरुण पुढे सरसावले. परंतु तेव्हा उपयोग काय ?..... हि घटना.
येथे कोरोनाचा काहीही सबंध नव्हता. तरीही माणुसकी विसरून हे लोक व्हिडिओ शूट करत होते. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. विचार करण्यायोग्य बाब आहे.
भविष्यात मानवी वृत्ती कशी असेल, हे तर जेव्हा - तेव्हा ची गोष्ट व त्याची कल्पना करणे हि कठीण. सध्याच्या स्थितीत आपण सर्वांनी कोरोनाला न घाबरता, या लढाईमध्ये जाती-जातीमध्ये भेद, एकमेकांबद्दलचा तिरस्कार, तुटकपणा सोडून देऊन लढण्यास सक्षम व्हावे. मानवी प्रजातीला काळाच्या आड जाण्यापासून प्रतिबंधित करावे.

